दत्ता जाधव
होळी आणि धुळवडीच्या दिवशी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यात राज्यभरातील १३,७२९ हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली होती. मात्र याच दिवशी कृषी विभागाने ३८,५६३ हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा नक्की किती, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, नुकत्याच झालेल्या अवकाळीत, वादळी वाऱ्यात आणि गारपिटीत सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांतील ८९६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यांत ८१५६ हेक्टरवरील पिकांचे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव तालुक्यांतील ७५६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हानिहाय झालेले नुकसान
जळगावात ८९६६ हेक्टर, धुळय़ात ८१५६ हेक्टर, औरंगाबादमध्ये ७५६८ हेक्टर, नगरमध्ये ४१७७, नाशिकमध्ये ४१५५ हेक्टर, पालघरमध्ये २०१७ हेक्टर, नंदूरबारमध्ये १७५३ हेक्टर, बुलडाण्यात ७७५ हेक्टर, रायगडमध्ये २२५ हेक्टर, वाशिममध्ये ४७५, अकोल्यात ११५ हेक्टर, वध्र्यात ८६ हेक्टर, सिंधुदुर्गमध्ये ४३ हेक्टर, पुण्यात ३९ हेक्टर आणि सोलापुरात १३ हेक्टर, असे एकूण ३८५६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
फडणवीसांनी जाहीर केलेली आकडेवारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पालघरमध्ये ७६० हेक्टर, नाशिकमध्ये २६८५ हेक्टर, धुळय़ात ३१४४ हेक्टर, नंदूरबारमध्ये १५७६ हेक्टर, जळगावात २१४ हेक्टर, नगरमध्ये ४१०० हेक्टर, बुलढाण्यात ७७५ हेक्टर आणि वाशिममध्ये ४७५ हेक्टर, असे एकूण १३,७२९ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.