पुणे : सुशिक्षित आणि गुणवंत तरुणांसाठी राजकारण हाही पर्याय आहे. सुशिक्षित तरुण राजकारणात येत नाहीत, तोपर्यंत राजकारणात परिवर्तन होणार नाही, अशी भूमिका केंद्रीय  वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी मांडले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २३ व्या पदवी प्रदान समारंभ दीक्षान्त भाषणावेळी गोयल बोलत होते. नॅकच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू आणि कृषी-सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, कुलसचिव जी. जयकुमार आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ८ हजार १८४ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. ७० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ४६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले.

गोयल म्हणाले, केंद्र सरकारने तरुणांतील क्षमतांचा अभ्यास करूनच स्टार्ट अप इंडियासारख्या योजना आणल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात लवचिकता येत आहे. तरुणांनी त्याचा लाभ घेत संकल्पनांना उद्योगाचे रूप द्यायला हवे. करोना हे एक संकट म्हणून आले असले तरी त्यातून अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. आताच्या काळात जागतिक पटलावर सर्वच क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरुणांनी पारंपरिक वाटा चोखाळण्याऐवजी नवकल्पनांच्या माध्यमातून आव्हानांना भिडायला हवे.

अतिरिक्त नियंत्रण ही ब्रिटिश मानसिकता

आपल्याकडे पाश्चात्त्य तेच आधुनिक अशी मानसिकता आहे. पण पाश्चात्त्य आणि आधुनिक यात फरक आहे. आपल्याकडे विद्यापीठांवर नियामक संस्थांचे अतिरिक्त नियंत्रण आहे. विद्यापीठे, महाविद्यालयांच्या प्रशासनावर नियामकांनी विश्वास दाखवायला हवा. गैरप्रकार झाल्यास त्यावर कारवाई निश्चितच केली पाहिजे. अतिरिक्त नियम ही ब्रिटिश मानसिकता आहे.

विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. आत्मनिर्भर भारतासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.