पुणे : ग्रामीण भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या परराज्यातील चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. लूटमार प्रकरणात अटक करण्यात आलेले तीन आरोपी हरयाणा, उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडून विविध बँकांची १४७ एटीएम कार्ड, पन्नास हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

समून रमजान (वय ३६, रा. पलवन, हरयाणा), नसरुद्दीन नन्ने खान (वय ३०, रा. चिटा, बुलंद शहर, उत्तर प्रदेश), बादशाह इस्लाम खान (२४, रा. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा साथीदार आदील सगीर खान (वय ३०, रा. बुलंदशहर, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

हेही वाचा – खासगी प्रकाशक कंपनीला महापालिकेच्या पायघड्या, नक्की काय आहे प्रकार ?

ग्रामीण भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड लुटण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. राजगड पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. पुणे-सातारा महामार्गावरुन एक मोटार कोल्हापूरला निघाली असून, मोटारीत लूट करणारे चाेरटे असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर भागात सापळा लावून मोटार अडविली. मोटारीतील चौघांची पोलिसांनी चौकशी सुरू केेली. तेव्हा एक जण मोटारीतून उडी मारुन पसार झाला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. मोटारीतून विविध बँकांचे १४७ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले, तसेच पन्नास हजारांची रोकड मोटारीत सापडली.

भोर तालुक्यातील कोळवडे भागातील रहिवाशाला चाकूच्या धाकाने लुटण्यात आले होते. शुक्रवारी (१७ जानेवारी) खेड शिवापूर भागातील कोंढणपूर येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एकाला चोरट्यांनी चाकूच्या धाकाने लुटले. एटीएम कार्ड चोरल्यानंतर आरोपींनी पन्नास हजार रुपये काढले होते. आरोपी मोटारीतून पसार झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावले. तेव्हा तक्रारदाराने मोटारीतून पसार झालेल्या चोरट्यांना ओळखले. त्यानंतर राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली.

हेही वाचा – साडेतीन हजार कोटींची थकबाकी वसुलीसाठी पुणे महापालिकेने घेतला हा निर्णय !

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, अजित पाटील, अंबादास बुरटे आणि पथकाने ही कामगिरी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक करण्यात आलेले चोरटे सराइत आहेत. त्यांनी बुलंदशहर, उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी पुण्यासह अन्य जिल्ह्यात गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.