पुणे : सहकारनगर भागताील तुळशीबागवाले काॅलनीत पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना पर्वती पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मंगळसूत्र, दुचाकी असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रोहन प्रभू तुपारे (वय २०, रा. त्रिमुर्ती नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), केशव ईश्वर कुंभार (वय १८ रा. खोपडेनगर, मांगडेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तक्रारदार महिला सहकारनगर भागातील तुळशीबागवाले काॅलनीत राहायला आहेत. १५ ऑगस्ट रोजी त्या तुळशीबागवाले काॅलनीतून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे तुपारे आणि कुंभार यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. पसार झालेल्या चाेरट्यांचा माग काढण्यात येत होता. तुपारे आणि कुंभार यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकाविल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, नानासाहेब खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख यांनी ही कामगिरी केली.