लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: खासगी प्रवासी बसमधील प्रवासी महिलांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाइल संच असा तीन लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

शिवा राजू शिंदे (वय ३०), के. तेजा उर्फ सुर्या शिंदे (वय २०, रा. दोघे रा. गंगाखेड, परभणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. २ एप्रिल रोजी फिर्यादी महिला लातूर ते पुणे या मार्गावर खासगी बसने प्रवास करत होत्या. पहाटे पाचच्या सुमारास त्या वानवडी भागातील क्रोम मॉलसमोर उतरल्या. त्यांनी पिशवी तपासली. तेव्हा पिशवीतील दहा तोळ्यांचे दागिने लांबविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हासंशयीत आरोपी परभणीतील गंगाखेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा- कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘क्रिप्टोबिझ’च्या संचालकासह दोघे अटकेत

पोलिसांच्या पथकाने गंगाखेड येथून आरोपी शिवा आणि सूर्या शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक अजय भोसले, विनोद भंडलकर, महेश गाढवे, संदीप साळवे, विष्णू सुतार आदींनी ही कारवाई केली.