पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुतारवाडी परिसरातील मुक्ता रेसिडन्सी सोसायटीत राहायला आहेत.
७ जून रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तक्रारदार सोमवारी बाहेरगावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे तपास करत आहेत.
उन्हाळी सुटीत अनेकजण सहकुटुंब बाहेरगावी जातात. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करून घरफोडी करत असल्याचे दिसून आले आहे. आठवडभरात घरफोडीचे सहा ते सात गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल झाले आहेत.