पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चोरट्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने दगडफेक केल्याची घटना देहूरोड येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, तिघे पसार झाले आहेत.

मुस्तफा मोबीन खान ( वय ३०) आणि मुस्तकीम मोबीन खान ( वय २५, दोघे रा. पिनागव्वान, जिल्हा नुह, हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एका महिलेसह त्यांचे तीन साथदार मोटारीतून पसार झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडी, देहूगाव येथील एका बँकेचे एटीएम मशिन फोडून १६ लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे एटीएम सुरक्षिततेसाठी देहूरोड पोलिसांनी रात्रगस्त वाढविली होती. सोमवारी रात्री देहू-आळंदी रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम मशिनजवळ एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची मोटार उभी असल्याचे पोलिसांना दिसले. मोटारीमधील व्यक्तींनी पोलीस दिसताच वेगाने मोटार पळवली. त्यानंतर पोलिसांनी एटीएमकडे धाव घेतली असता, शटर अर्धवट उचकटलेले दिसले. आतमधून आवाज येत असल्याने त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एटीएममध्ये दोन व्यक्ती गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडत असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच आरोपींनी आरडाओरड, शिवीगाळ करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परंतु, पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांना ताब्यात घेतले. तर, एका महिलेसह तिघे फरार झाले.