पुणे : विमानाने पुण्यात येऊन एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी नियाज इजाज मोहम्मद (वय २९), सावेज सलीम अली (वय ३०, दोघेही रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. गेल्या महिन्यात ९ मे रोजी खडकी बाजार परिसरातील ते एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आले होते. त्या वेळी आरोपी नियाज आणि सावेज हे एटीएमच्या बाहेर दबा धरून बसले होते. ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. चोरट्यांनी त्यांच्याकडील एटीएम कार्डचा वापर केला. पैसे न मिळाल्याने दोघांनी त्यांना त्यांच्याकडील एटीएम कार्ड दिले. त्यानंतर ज्येष्ठाच्या चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यातून एक लाख चार हजार ६५० रुपये काढून घेतले.

पैसे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नियाज, सावेज हे उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी नाना पेठेतील लाॅजवर राहत असून, उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन ते पुण्यात फसवणुकीचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, हवालदार प्रशांत माळी, संदेश निकाळजे, अश्विनी कांबळे, भाऊसाहेब शेवरे, सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषीकेश दिघे, दिनेश भोये, प्रताप केदारी यांनी ही कामगिरी केली.