पुणे : गेल्या काही वर्षांत चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता सातत्याने वाढत असताना यंदाचे वर्ष अपवाद ठरले आहे. २०१२नंतर यंदा अरबी समुद्र वा बंगालच्या उपसागरात एकाही चक्रीवादळाची निर्मिती झाली नाही. दरम्यान, चक्रीवादळ ही हवामान बदलाच्या तुलनेत छोट्या स्तरावर घडणारी हवामानशास्त्रीय घटना असून, यंदाच्या मान्सूनपूर्व काळात एकाही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती न होण्यामागे अनेक तत्कालिक घटक कारणीभूत असू शकतात, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले.
मान्सूनपूर्व (एप्रिल ते जून) आणि मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते डिसेंबर) काळ चक्रीवादळांसाठी पोषक मानला जातो. या काळात बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात चक्रीवादळे येतात. त्यातही मान्सूनोत्तर काळातील चक्रीवादळांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. मान्सूनपूर्व काळात एक ते दोन चक्रीवादळे तयार होतात, तर मान्सूनोत्तर काळात दोन ते तीन चक्रीवादळांची निर्मिती होते.
गेल्या ४५ वर्षांत मान्सूनोत्तर काळात एकही चक्रीवादळ आले नाही, असे घडलेले नाही. परंतु, मान्सूनपूर्व काळात एकही चक्रीवादळ न येण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेल्या ४५ वर्षांत मान्सूनपूर्व काळात अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात एकही चक्रीवादळ निर्माण झाले नाही, अशी ११ वर्षे नोंदवली गेली. मान्सूनपूर्व काळात एकही चक्रीवादळ आले नाही, असे अलीकडील काळात २०१२मध्ये घडले होते. तसेच २०११, २००५, १९९५, १९९३, १९८८, १९८६, १९८४, १९८३, १९८१, १९८० या वर्षीही मान्सूनपूर्व काळात एकाही चक्रीवादळाची निर्मिती झाली नव्हती, अशी माहिती पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. मेधा देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
त्या म्हणाल्या, ‘एखाद्या हंगामात चक्रीवादळांचा अभाव असणे किंवा जास्त चक्रीवादळे होण्याचे कारण हवामान बदल, जागतिक तापमानवाढ आहे किंवा मान्सूनपूर्व काळात चक्रीवादळे झाली नाहीत म्हणजे जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल नाही, असे म्हणता येत नाही. एखाद्या वर्षी घडणाऱ्या हवामानशास्त्रीय घटनेचा संबंध थेट हवामान बदल किंवा जागतिक तापमानवाढीशी जोडणे चुकीचे आहे. हवामान बदल हा पृथ्वीच्या स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक सरासरी हवामानाच्या नमुन्यांमधील दीर्घकालीन बदल असतो. चक्रीवादळ ही हवामान बदलाच्या तुलनेत छोट्या स्तरावर घडणारी हवामानशास्त्रीय घटना आहे. त्यासाठी हवेतील, समुद्रातील काही पोषक घटक आवश्यक असतात.’
‘जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणामधील पोषक घटकांची शक्यता वाढू लागली आहे. मात्र, सर्व घटक पोषक असूनही चक्रीवादळाची निर्मिती होईलच असेही नाही. यंदा मान्सूनपूर्व काळात अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात एकाही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती न होण्यामागे अनेक तत्कालिक घटक कारणीभूत असू शकतात,’ याकडे डॉ. देशपांडे यांनी लक्ष वेधले.
मान्सूनपूर्व काळात जास्त चक्रीवादळांची निर्मिती दुर्मीळ
‘मान्सूनपूर्व काळात एकही चक्रीवादळ न येण्याची शक्यता सुमारे २५ टक्के असते. त्यामुळे यंदाच्या मान्सूनपूर्व काळात चक्रीवादळ न येणे ही काही असामान्य घटना किंवा फार काही वेगळे घडले, असे नाही. याउलट, मान्सूनपूर्व काळात तीन चक्रीवादळे येण्याची शक्यता सुमारे ४ टक्के आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात जास्त चक्रीवादळांची निर्मिती झाल्यास ते दुर्मीळ मानले जाऊ शकते,’ असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.