पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन टोळ्यांना पोलिसांनी अटक केली. कात्रज भागातील आंबेगाव, चंदननगर, तसेच बालेवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई केली.
आंबेगाव परिसरात तडीपार केल्यानंतर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताांना पाेलिसांनी अटक केली. प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (वय २४, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), राहुल नागेश माने (वय २९, रा. सिद्धिविनायक सोसायटी, जांभुळवाडी रस्ता आंबेगाव खुर्द), प्रशांत दत्तात्रय माने (रा. गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पृथ्वीराज कांबळे, करण पटेकर हे पसार झाले. याबाबत पोलीस शिपाई राकेश टेकवडे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
प्रथमेश कुडले याला शहरातून दोन वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे. कुडले आणि साथीदार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नगर रस्त्यावरील चंदननगर भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सराइत आकाश आनंद बेत्ती (वय २०, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर), अमोल वसंत चोरघडे (वय २३, रा. राजश्री कॉलनी, वडगावशेरी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार योगेश संजय शिरसाठ, साहिल शकील सय्यद, आकाश भरत पवार पसार झाले आहेत. याबाबत पोलीस शिपाई ज्ञानोबा लहाने यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बालेवाडी येथील साई चौकात मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला बाणेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेला एक जण पसार झाला. पोलीस शिपाई कृष्णा तोरडमल यांनी याबाबत बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
