लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटात दुखत असताना तपासणी करण्यास डॉक्टर, परिचरिकांनी निष्काळजीपणा केल्याने जन्मताच बाळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी औंध सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तीन परिचारिकांना दोषी ठरवत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड आणि दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. महिलेला एक लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश पिंपरी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिरी एन. आर. गजभाये यांनी दिला.
औंध सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्पिता प्रदीप बावरकर (रा. मुकुंदनगर), डॉ.आत्माराम व्यंकटराव शेजुळ (वय ४८, रा. हडपसर), परिचारिका मनीषा भालचंद्र जोशी (रा. नवी सांगवी), उज्ज्वला दत्तात्रय नागापूर (रा. यमुनानगर, निगडी) आणि शुभांगी रामचंद्र कांबळे (रा. थेरगाव) अशी शिक्षा ठोठावल्यांची नावे आहेत. याबाबत औंध रुग्णालयातील वाहनचालक भगवान दौलत वाकोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांची मुलगी मनीषा नीलेश ओरू (रा. केशवनगर, वडगावशेरी) हिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही घटना २९ नोव्हेंबर २०१० मध्ये घडली होती.
आणखी वाचा-पुणे: स्वारगेट चौकात दुचाकी चालकावर गोळीबार, एक जण गंभीर जखमी
मुलगी मनीषा ओरु हिला बाळंतपणासाठी औंध रुग्णालयात २९ नोव्हेंबर २०१० रोजी दाखल करण्यात आले होते. तिच्या पोटात दुखत असल्याबाबत डॉ. बारवकर, डॉ. शेजुळ यांना सांगितले. परंतु, त्यांनी तपासणी करण्यास निष्काळजीपणा केला. तसेच मनीषा हिच्या पोटात दुखत असल्याबाबत वारंवार सांगूनही परिचारिकांनी डॉक्टरला सांगण्यात हयगय केली. डॉक्टर, परिचरिकांच्या निष्काळजीपणामुळे मनीषा हिच्या बाळाचा जन्मतःच मृत्यू झाले. त्यामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी गुन्ह्याचे तांत्रिक, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. ५० हजार रुपयांचा दंड आणि दोन वर्षांच्या साध्या कारावाासची शिक्षा ठोठावली आहे. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
