पुणे : कोरेगाव-भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळय़ासाठी रविवारी (१ जानेवारी) होणारी गर्दी विचारात घेऊन पुणे पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या राज्यभरातील ७० कार्यकर्त्यांना कोरेगाव भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

अभिवादन सोहळय़ासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहतात. गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे ग्रामीण, पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामीण पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्ताचा आढावा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी (३१ डिसेंबर) यांनी घेतला. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.

गर्दीच्या व्यवस्थापनाची तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे तसेच राज्यातील ७० जणांना कलम १४४ अनुसार कोरेगाव-भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

समाजमाध्यमांवर लक्ष

अभिवादन सोहळय़ाच्या अनुषंगाने पोलिसांनी समाजमाध्यमांवरील मजकुरावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या सोहळय़ासाठी येणाऱ्या अनुयानांनी पोलिसांना सहकार्य करून कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी केले आहे.

बंदोबस्त असा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरेगाव-भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळय़ासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी पेरणे फाटा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा बंदोबस्तात राहणार आहेत. अभिवादन सोहळय़ात होणारी गर्दी विचारात घेऊन पेरणे फाटा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सोहळय़ावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.