पुणे : ‘गुलटेकडी, मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात सतत होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे,’ अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. या भागात अवजड वाहने येऊ नये, यासाठी ‘हाईट बॅरिअर’ लावून अपघातांचा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. गंगाधाम चौकात बुधवारी झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एका महिलेला जीव गमवावा लागला. या चौकात यापूर्वी देखील अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे प्रकार घडल्यानंतरही महापालिका तसेच पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. या भागात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंदी घालावी. तसेच, आई माता मंदिर येथे अवजड वाहनांसाठी अडथळा ठरणारे लोखंडी खांब (हाईट बॅरिअर) उभारावेत, असे महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांना कळविले आहे.
महापालिकेने केलेल्या या मागणीवर मार्केट यार्ड येथील व्यापारी आणि ‘दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स’चे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी आक्षेप घेतला आहे. ‘केवळ हाईट बॅरिअर उभारून हा प्रश्न सुटणार नाही. तर, आई माता मंदिर ते पूना मर्चंट चेंबर असा उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. या भागातील व्यापाऱ्यांनीदेखील यासाठी अनेकदा मागणी करूनही त्याकडे स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत,’ असा आरोप संचेती यांनी केला.
गंगाधाम चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. मार्केट यार्ड येथे ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. मार्केट यार्डवरून शहराला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. त्यातच या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ३२ मजल्यांच्या इमारती होणार आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढणारच आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण आणण्याासाठी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी वालचंद संचेती यांनी केली आहे.