लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पदपथावर लापलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार आधाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पदपथावर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोईंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत होते. त्या वेळी आरोपींनी कारवाईस विरोध करुन हवालदार आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी हवालदार आघाव यांना चप्पलेने मारहाण करुन धक्काबुक्की केली. त्यांनी आघाव यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत.