पुणे : भिडे पुलावरील वाहतूक शनिवारपासून (११ ऑक्टोबर) पूर्ववत करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे.

भिडे पूल मेट्रो पुलाच्या कामानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे, तसेच नदीपात्रातील रस्त्याने डेक्कन जिमखाना, तसेच नारायण पेठेत ये-जा करणारे वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. भिडे पूल बंद असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. वळसा घालून पुन्हा डेक्कन जिमखान्याकडे यावे लागत होते. भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली होती.

दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन शनिवारपासून (११ ऑक्टोबर) भिडे पूल सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत वाहतुकीस खुला करुन देणारा आहे. रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामानिमित्त भिडे पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार नाहीत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.