पुणे : शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी दिले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची बृहन्मुंबई पोलीस दलात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.
पुणे पोलिसांच्या प्रशासन विभागातील अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांची अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे पोलिसांच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांची बदली करण्यात आली असून, नागपूर पोलीस दलात अतिरिक्त आयुक्तपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस दलातील उपायुक्त अमोघ गावकर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य विजयकुमार मगर यांची राज्य राखीव पोलीस दल, रामटेकडी (एसआरपीएफ) येथे उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांची पाेलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, परिवहन विभागात उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.