पुणे: शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या वाढीतील अडचणी दूर करण्याबरोबरच झाडांवर ठोकण्यात आलेले खिळे काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने ‘वृक्ष रुग्णवाहिका’ (ट्री ॲब्युलन्स) हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या ५ जूनपासून याची सुरुवात केली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही माहिती दिली.

पुणे शहरातील अनेक भागांत जुनी झाडे आहेत. विकासकामे करताना काही वृक्ष अडथळा ठरत असल्याचे ते काढून त्यांचे पुनर्रोपण महापालिकेच्या वतीने केले जाते. शहरात अस्तित्वात असलेल्या झाडांची वेगवेगळ्या कारणांमुळे पडझड होते, तर अनेक झाडांवर बेकायदा जाहिराती करण्यासाठी झाडांवर खिळे ठोकले जातात. या प्रकारामुळे या झाडाचे आयुष्य कमी होते. खिळे ठोकल्याने ही झाडे अधिक काळ टिकत नाहीत. त्यामुळे महापालिकेने ‘वृक्ष रुग्णवाहिका’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील सर्व झाडांची पाहणी केली जाणार आहे. ज्या झाडांना खिळे ठोकलेले आहेत. ते काढून टाकले जाणार आहेत. झाडांच्या वाढीसाठी अडथळा ठरणारे फलक, तसेच इतर बाबी हटविल्या जाणार आहेत. या विशेष वृक्ष रुग्णवाहिकेमध्ये झाडांची काळजी घेणारी सर्व यंत्रणा उपलब्ध असणार आहे. उद्यान विभागासोबत हा उपक्रम शहरात राबविला जाणार असून, या माध्यमातून शहरातील विविध झाडांची काळजी घेतली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील झाडांना खिळे ठोकण्यात आल्याने त्यांचे आयुष्य कमी होऊन ती सुकण्याचे प्रमाण अधिक आहे. झाडांच्या वाढीसाठीचे अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. सामाजिक संस्थांनी (एनजीओ) यात भाग घ्यावा. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका