पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या वाकड ते सांगवीदरम्यानच्या सुधारासाठी एक हजार झाडे ताेडण्यात येणार आहेत. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाने ३१ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. नदी सुधारसाठी झाडे तोडण्यास वृक्षप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी सुधारचे काम हाती घेतले आहे. तीन टप्प्यांमध्ये काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सूर्या रुग्णालय, वाकड ते कस्पटे वस्ती स्मशानभूमी, दुसऱ्या टप्प्यात कस्पटे पूल ते पिंपळे निलख येथील इंगाेले घाट आणि तिसऱ्या टप्प्यात इंगाेले घाट ते जुनी सांगवी पुलापर्यंत काम करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यान आणि पर्यावरण विभागाने नदी सुधार प्रकल्पांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे सर्वेक्षण केले. वाकड ते सांगवीदरम्यान नदीकाठी सहा हजार ८४६ विविध प्रजातीची झाडे आढळली. त्यातील तीन हजार ५८५ झाडे प्रकल्पापासून बाधित हाेत असतानाही वाचविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
तर, दोन हजार २५२ झाडांचे पुनर्राेपण करण्यात येणार आहे. प्रकल्पाला अडथळा ठरणारी एक हजार नऊ झाडे ताेडावी लागणार आहेत. यामध्ये बहुतांशी झाडे ही करंज, चिंच, बाभूळ, जंगली एरंडेल अशा प्रजातीची असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले आहे. या वृक्षांबाबत पर्यावरणप्रेमींसह अन्य काेणाचा आक्षेप असल्यास याेग्य कारण, वस्तुस्थितीदर्शक पुराव्यासह लेखी हरकत घेण्याचे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. ३१ जुलैपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या हरकतींवर ४ ऑगस्ट राेजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी अडथळा ठरणारी एक हजार नऊ झाडे ताेडावी लागणार आहेत. यामध्ये करंज, चिंच, बाभूळ अशा विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. हरकतींवरील सुनावणीनंतर वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे वृक्षाधिकारी महेश गारगाेटे यांनी सांगितले.
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी अवैधरीत्या काही झाडे तोडली आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या व्यतिरिक्त नव्याने एक हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव आणला आहे. ही झाडे तोडू नयेत. पुनर्राेपण केलेली झाडे जगत नाहीत, असे वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले.