पुणे : पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गावर सोमवारी चाचणी घेण्यात आली. यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावण्याची घटना घडली आहे.
जिल्हा न्यायालय स्थानकातून मेट्रो गाडीची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू झाली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो गाडी ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वारगेट स्थानकात पोहोचली. जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मीटर, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किलोमीटर आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किलोमीटर आहे. एकूण ३.६४ किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी एक तास वेळ लागला.
हेही वाचा >>>पुणे: रिंगरोड भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात; जमीनमालक मालामाल
या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किलोमीटर ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. या मार्गावरील सर्व स्थानके भुयारी असून, जिल्हा न्यायालय स्थानक ३३.१ मीटर खोल, बुधवार पेठ स्थानक ३० मीटर खोल, मंडई स्थानक २६ मीटर खोल आणि स्वारगेट स्थानक २९ मीटर खोल आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गांची कामे वेगाने सुरू आहेत. काही महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोची चाचणी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. ही मार्गिका भुयारी असून, मुठा नदीच्या खालून जात आहे. येत्या काही महिन्यांत प्रवाशांना पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होईल. रुबी हॉल ते रामवाडी हा मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी सुरू होईल.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो