पुणे : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘खूब लढी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी’ असा जयघोष, तसेच शंखांच्या निनादात रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून बुधवारी अभिवादन करण्यात आले. या वेळी मॉडर्न हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या घोषपथकाने चैतन्यपूर्ण वादन सादर केले.
शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिरासमोर कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या सहकार्याने राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि पुणे महापालिकेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करण्यात येते. यावेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरिभाऊ मुणगेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, सदस्य डॉ. राजश्री महाजनी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह, माजी नगरसेविका डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त गोविंद दांगट, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या पुणे केंद्राचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, सचिन टापरे, प्रवीण पगारे, मकरंद फणसळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मॉडर्न हायस्कूलमधील साडेतीनशे विद्यार्थिनी या अभिवादन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज घेऊन विद्यार्थिनींनी जोशपूर्ण घोषणा दिल्या. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका डॉ. उज्ज्वला मोरे, पर्यवेक्षिका वैशाली घोडके, संस्था समन्वयिका अनुप्रिती गाजरे, क्रीडा शिक्षिका शिल्पा ओळकर, भाग्यश्री शिंदे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.