पुणे शहरातील एरंडवणा परिसरात असलेल्या अनंत रेस्टॉरंट अँण्ड बार मध्ये चार चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणा परिसरात असलेल्या अनंत रेस्टॉरंट अँण्ड बार बंद केल्यानंतर, तोंडाला मास्क लावून १० ते १५ मिनिटांनी चौघांनी बारचे शटर वर करून आतमध्ये प्रवेश केला. त्या चौघांनी हातामधील कोयत्याचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. आम्हाला पैसे द्या, अशी मागणी करीत गल्ल्यातील २० हजार रुपये घेऊन चोरटे काही मिनिटात घटना स्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी सांगितले, या घटनेची माहिती मिळताच आमची टीम काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी तेथील कर्मचारी वर्गाकडून माहिती घेतली आणि तेथील सीसीटीव्ही पाहिले. त्यामध्ये या घटनेतील चार ही आरोपी अगोदर बार मध्ये येऊन गेल्याचे दिसत असून त्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले.