पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, तसेच दोन काडतुसे जप्त करण्यात आली. कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. शुभम प्रमोद माने (वय २६, रा. शिवशंभोनगर, गल्ली क्रमांक ४, कात्रज-कोंढवा रस्ता), गणेश बाबासाहेब लंके (वय २७, रा. ओम निवास, महादेवनगर, शेलार मळा, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावर भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी कपिलामृत डेअरीजवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात तिघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. मोकळ्या मैदानात ते पिस्तुलातून गोळीबाराचा सराव करणार असून, ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून माने आणि लंके यांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
माने आणि लंकेने पिस्तूल का बाळगले, त्यांंनी पिस्तूल कोणाकडून खरेदी केले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक समीर शेंडे, सौरभ वायदंडे, संग्राम पवार, सागर कोंडे, केतन लोखंडे यांनी ही कारवाई केली.