फेसबुकवरील प्रेमामुळे मुलांनी बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात उजेडात आली आहे. धनंजय नवनाथ बनसोडे वय- ४३ अस हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. हत्या झालेले धनंजय बनसोडे आणि नाशिक येथील ४३ वर्षीय महिलेचे फेसबुकवरून प्रेमसंबंध जुळले होते. धनंजय यांच्या मुलांना आणि पत्नीला ही बाब माहिती होती. याच रागातून मुलगा सुजित धनंजय बनसोडे वय- २२ आणि अभिजित धनंजय बनसोडे वय- १८ यांनी बापाची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी ४३ वर्षीय प्रेयसी महिलेने म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. हत्या झालेले धनंजय आणि आरोपी मुलं हे पुण्यातील निघोज ता. खेड, जि. पुणे येथील रहिवाशी आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, हत्या झालेल्या धनंजय यांची फरसाण तयार करण्याची कंपनी (कारखाना) आहे. तिथं, मुलं आणि ते काम करत होते. त्यांच्या हाताखाली काही कामगार काम करत होते. गेल्या तीन वर्षांपासून ४३ वर्षीय महिलेसोबत धनंजय यांचं फेसबुकवरून प्रेम प्रकरण सुरू होतं. काही महिन्यांनी याबाबत धनंजय यांच्या पत्नीला, मुलगा अभिजित आणि सुजित यांना माहीत होतं. यावरून त्यांचे मुलांसोबत अनेकदा वादही झाले. तर, पत्नीदेखील दीपावलीपासून सोबत राहत नव्हती. याच रागातून मुलांनी झोपेत असलेल्या धनंजय यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारून खून केला. मध्यरात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्ही मुलांनी बापाचा मृतदेह त्यांच्या फरसाण कारखान्यातील भट्टीत जाळला, त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून गरबत्या लावण्यात आल्या अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. तसेच त्यांची राख पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ती इंद्रायणी नदीत टाकून दिली आणि त्या भट्टीत दुसरीच राख आणून टाकली. 

हेही वाचा- Flashback 2022 : देशवासीयांना हादरवणारी २०२२ मधील अमानुष हत्याकांड ; आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा  

दरम्यान, प्रेयसी आणि धनंजय यांच्यात दररोज व्हाट्सएप चॅटिंग व्हायचं. सकाळी फोनवरून बोलणं होत असायचं. पण अचानक व्हाट्सएप चॅटिंगची भाषा यात तफावत आढळत होती. धनंजय नेहमीप्रमाणे फोन उचलत नसल्याने ४३ वर्षीय फेसबुकवरील प्रेयसीने धनंजय यांच्या मित्राला फोन केला आणि धनंजयबाबत विचारपूस केली. तेव्हा, धनंजय बेपत्ता असल्याचं प्रेयसीला समजलं. चॅटिंग करणारी व्यक्ती ही धनंजयचा मुलगा होता. अस प्रेयसीच्या लक्षात आलं. प्रेयसीने थेट पिंपरी- चिंचवड पोलिसांना फोन लावून धनंजयसोबत बरेवाईट झाल्याची शंका उपस्थित केली. म्हाळुंगे पोलिसांनी तातडीने अभिजित आणि सुजित यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक: फिफा विश्वचषकाचा आनंद क्षणात विरला, मुंबईत पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा अंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांनी बापाची हत्या केल्यानंतर केली होती मिसिंगची तक्रार दाखल

अभिजित आणि सुजित यांनी बापाची हत्या केल्यानंतर ते १५ ते १६ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान घरातून निघून गेले असल्याची तक्रार म्हाळुंगे पोलिसात दिली होती. त्याचा तपास म्हाळुंगे पोलिस करत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी अभिजित आणि सुजित यांनी हा प्लॅन केला होता.