डेक्कन जिमखाना भागात दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले व त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

इंद्रनाथ उर्फ समाधान श्रीराम तिरमले (वय २०), सुरेश उर्फ भैय्या रामधन मुंडे (वय २०, दोघे रा. टाकेवाडी, फुलारवाडी वस्ती, ता. परळी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. तिरमले आणि मुंडे यांनी उत्तमनगर तसेच चंदननगर भागातून दोन दुचाकी चोरल्या होत्या. डेक्कन जिमखाना भागात दोघे जण दुचाकीवरुन आले होते. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी पथकाला मिळाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दोघांना आपटे रस्ता परिसरात सापळा लावून पकडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा दोघांनी दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. तपासात दोघांनी उत्तमनगर आणि चंदनगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोघांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, शाहीद शेख, बाळू गायकवाड, निलेश शिवतारे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे, श्रीकांत दगडे, सुमीत ताकपेरे आदींनी ही कारवाई केली.