पिंपरी- चिंचवड : लोणावळ्यात पिस्तुलाचा धाक दाखवून चिक्की विक्रेत्याला लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. दोन तरुणांनी मारहाण करून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून चिक्की विक्रेत्याला लुटले आहे. आज रविवार असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. हेच लक्षात घेऊन अनेक दुकानदार पहाटे चिक्की ची दुकाने उघडतात. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घटना घडली आहे.
जुना पुणे- मुंबई महामार्गावर गवळी वाडा येथे असलेल्या चिक्कीच्या दुकानात अज्ञात तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून विक्रेत्याला लुटले आहे. दुकानाच्या गल्ल्यातील पैसे घेऊन अज्ञात तिघांनी पळ काढला आहे. रुमालाने तोंड बांधून आलेल्या दोघांनी चिक्की विक्रेत्याला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. कानशिलात देखील लागवल्याच सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. पिस्तुल दाखवून विक्रेत्याला दमबाजी करण्यात आली. तोंडावर बुक्कीने पंच मारला.
दोघांनी कॉलर पकडून गल्ल्यातील पैसे घेतले आणि तिथून पळ काढला आहे. या घटनेमुळे लोणावळ्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण आहे. पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असून पुणे, मुंबईमधून अनेक पर्यटक येतात. त्यामुळे अशा घटनांकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.