पुणे : ‘मुलांना वाचनाची गोडी लावणारी, पारंपरिक खेळ शिकवणारी बालपुस्तक जत्रा ही पुण्यापुरती मर्यादित राहता नये. हा उपक्रम राज्यभरात झाला पाहिजे,’ असे मत उद्योगमंत्री आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी मांडले. प्रत्येक जिल्ह्यात बालपुस्तक जत्रा राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेच्या उद्घाटनावेळी सामंत बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, लेखिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक ल. म. कडू, साहित्यिक राजीव तांबे, संवाद पुणेचे सुनील महाजन, प्रसेनजित फडणवीस, कृष्णकुमार गोयल, शिरीष देशपांडे या वेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘पूर्वीची लहान मुले आणि आताची लहान मुले यांच्यातील फरक आपला स्पष्ट जाणवतो. अंगणात खेळ खेळणारी मुले पूर्वी फारशी आजारी पडत नव्हती. पुस्तकांना भारतीय पारंपरिक खेळांची जोड दिल्याने ही जत्रा नावीन्यपूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे बालपुस्तक जत्रेसारखे उपक्रम राज्यभरात झाले पाहिजेत.
‘लहानपणी खेळल्याचा फायदा आज कळत आहे. तंदुरुस्त राहणे, एकाग्रता वाढण्यासाठी हे खेळ उपयुक्त ठरतात. पुस्तक वाचनाचा आनंद लॅपटॉपवर वाचून मिळत नाही. त्यामुळे मुलांनी वाचनासह पारंपरिक भारतीय खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा,’ असे मिसाळ यांनी सांगितले. ‘भारतीय खेळ खेळल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते, व्यक्तिमत्त्व विकास चांगला होतो. वाचन संस्कृती वाढण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांना राज्य सरकार नेहमीच पाठिंबा देईल,’ असे पाटील यांनी नमूद केले.
पांडे म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअरमध्ये मुलांसाठी वेगळा विभाग असतो. त्या धर्तीवर मुलांसाठी बालपुस्तक जत्रा आयोजित करण्याची कल्पना पुढे आली.
मुले, पालक रमले अंगणातल्या खेळांमध्ये
बालपुस्तक जत्रेमध्ये भोवरा, टिपरी-पाणी, टायर फिरवणे, विटीदांडू अशा खेळांचाही समावेश आहे. त्यामुळे पालक, मुले हे खेळ खेळण्यात रमले होते. काही पालक मुलांना भोवरा कसा फिरवायचा हे शिकवत होते. तर काही पालकांनीही हे खेळ खेळून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
‘पारंपरिक खेळ’ पुस्तकाचे प्रकाशन
जुुन्या भारतीय खेळांच्या माहिती संकलन करून रेवा पांडे यांनी लिहिलेल्या ‘पारंपरिक खेळ’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. ‘मला दोन-तीनच पारंपरिक खेळ माहीत होते. मात्र, माझ्यासारख्या अनेकांना जुन्या खेळांविषयी माहिती नाही. त्यामुळे एक पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली,’ असे रेवा पांडे यांनी सांगितले.