लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लघुरूपाचा वापर केलेल्या ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिला आहे. मान्यताप्राप्त ऑनलाइन अभ्यासक्रम आणि संस्थांची यादी यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी त्या अभ्यासक्रमाची वैधता तपासण्याबाबत यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील नोटीस संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. काही व्यक्ती, संस्था उच्च शिक्षण प्रणालीतील मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रमांशी साधर्म्य असलेल्या अभ्यासक्रमांची लघुरूपे वापरून ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करत आहेत. त्यात ‘दहा दिवसांत एमबीए’ या अभ्यासक्रमाने यूजीसीचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेने पदवी अभ्यासक्रमाचे लघुरूपासह नामाभिधान, कालावधी, प्रवेश पात्रता अधिकृत राजपत्राद्वारे यूजीसीकडून प्रसिद्ध केले जाते. त्याशिवाय पदवी देण्याचा अधिकार केवळ केंद्रीय कायद्याद्वारे, राज्य कायद्याद्वारे स्थापन झालेले विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेला आहे.

आणखी वाचा-‘रेवण्णांवरील आरोपांबाबत विरोधकांचे राजकारण’; महिला अत्याचारांबाबत कठोर भूमिका : सीतारामन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूजीसीच्या नियमानुसार कोणताही ऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनाही यूजीसीकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्यास मान्यता दिलेल्या उच्च शिक्षण संस्थांची यादी आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची यादी यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही ऑनलाइन अभ्यासक्रमाला अर्ज करण्यापूर्वी आणि प्रवेश घेण्यापूर्वी भागधारकांनी त्या अभ्यासक्रमाची वैधता तपासून घ्यावी, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.