पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल गाडय़ांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना लोकलबरोबरच पुणे-मुंबई दरम्यानही जादा गाडय़ांची मागणी सातत्याने केली जात आहे.. दुसरीकडे याच मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ा व मालगाडय़ांचीही रेलचेल असते.. मार्गाचे तीनपदरीकरण कधी होईल ते कुणालाही माहीत नाही. त्यामुळे सर्वाधिक भर आहे तो रेल्वे गाडय़ांचा वेग वाढविण्यावरच.. वेग वाढविण्यासाठी ओव्हरहेड वाहिन्यांची क्षमता वाढविली, पण घोडे अडले ते स्वयंचलित सिग्नल यंत्रणेवर.. सध्याही या मार्गावर जुन्याच पद्धतीची मानवी हस्तक्षेपाची सिग्नल यंत्रणा आहे. सिग्नल स्वयंचलित झाल्यास रेल्वे वाहतुकीला वेग येऊन गाडय़ा वाढविण्याची प्रवाशांची मागणीही पूर्ण होऊ शकणार आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलचा विचार केल्यास दरवर्षी प्रवाशांच्या संख्येमध्ये भरच पडलेली आहे. पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या चार लोकल आहेत. या लोकल दिवसभरात सुमारे ४० फेऱ्या करतात. त्याचा लाभ दररोज सुमारे ७० ते ८० हजार प्रवासी घेत आहेत. विद्यार्थी, छोटे व्यापारी, कामगार यांच्याकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल बारा डब्यांची करण्याची तब्बल पंधरा वर्षांची मागणी दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली. चारही लोकल आता बारा डब्यांच्या करण्यात आल्या आहेत.
 पुणे व िपपरी-चिंचवड शहर तसेच तळेगाव-लोणावळ्यापर्यंतच्या भागाचा होणारा विस्तार लक्षात घेता, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आणखी एक लोकल पुण्यासाठी द्यावी व उपलब्ध लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करीत आहेत. पुणे-लोणावळा मार्गावर लोकल किंवा त्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी गाडय़ांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वीजवाहिन्या डायरेक्ट करंटऐवजी (डीसी) आता अल्टरनेट करंटवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. वीज वाहिन्यांची क्षमता वाढल्यामुळे आता लोकलचा वेग ताशी सुमारे १०० किलोमीटर करणे शक्य होईल, असे वाटले होते. काही दिवस तसा प्रयोगही झाला मात्र तो स्वयंचलित सिग्नल यंत्रणेअभावी फसला. त्यामुळे सिग्नलची ही यंत्रणा या मार्गासाठी सध्या सर्वाधिक गरजेची बनली आहे.

 वेग वाढल्यास काय होईल?
लोकलला पुण्याहून लोणावळ्याला जाण्यास सध्या एक तास २५ मिनिटांचा कालावधी लागतो. वेग वाढल्यास ही गाडी थांब्यांवरील वेळ धरूनही सुमारे एक तासाहून कमी वेळेत हे अंतर पूर्ण करू शकेल. प्रत्येक सिग्नलहून गाडी पुढे गेल्यास आपोआपच मागील गाडीसाठी सिग्नल खुला होतो. मुंबईत याच यंत्रणेमुळे एका मागून एक गाडय़ा सोडता येतात. पुणे-लोणावळा मार्गावर मात्र या यंत्रणेअभावी अनेकदा गाडय़ांना उशीर होतो. प्रत्येक लोकल तिच्या ठराविक वेळेत पुढे गेली तरी एखादी जास्त लोकल सोडता येणे शक्य होईल व त्यातून प्रवाशांची गैरसोयही दूर होऊ शकेल.