पुणे : राज्यात नुकत्याच लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) राज्यभरातील १९६ स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा केली जाणार आहे. परिवहन विभागाने एप्रिल महिन्यापर्यंत २३६.७१ कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळाच्या ७८ बस स्थानकांवर चार्जिंग सुविधा निर्माण केली असून, उर्वरित ११८ बस स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत, तसेच महत्त्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार धोरणात प्रोत्साहनपर उपाययोजना आणि शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींपैकी चार्जिंगविषयक पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने राज्यात एसटी महामंडळाची सर्व बस स्थानके, आगार आणि थांब्यांवर किमान एक जलद चार्जिंग स्थानक उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाने २५१ आगार आणि ५६५ स्थानकांवर तपासणी करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील १९६ आगार, स्थानके निश्चित केली. या स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा कार्यान्वित करण्यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. सरकारकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३०० कोटी रुपये, तर २०२४-२५ मध्ये ८५ कोटी असे एकूण ३८५ कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले. एप्रिल २०२५ पर्यंत २३६.७१ कोटी रुपयांचा निधी खर्च करून ७८ बस स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर ११८ बस स्थानकांवर सुविधा कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाच्या स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा विकसित करण्यासाठी काम दिलेल्या कंपन्यांकडून केवळ एसटी महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या ई-शिवाई, शिवशाही, ई-शिवनेरी आणि इतर इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बस एसटी महामंडळामध्ये दाखल होतील, त्यानुसार सुविधांमध्ये नव्याने भर घालून उपकरणांची सुविधा उपलब्ध करावी, असा निर्णय घेतला.
चार्जिंग सुविधेअंतर्गत प्रगतिपथावर असलेली स्थानके
विभाग | एकूण स्थानके |
मुंबई | १० |
पुणे | ११ |
नाशिक | २२ |
नागपूर | १७ |
छत्रपती संभाजीनगर | ३९ |
अमरावती | १९ |
एसटी महामंडळाचा आढावा
एसटीची एकूण स्थानके – ५६५
एसटीची एकूण आगार – २५१
इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) राज्यभरातील स्थानक आणि आगारांच्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या बसच्या संख्येनुसार महत्त्वाच्या आणि लांब पल्ल्यांच्या बस ज्या ठिकाणी थांबतात. अशा बस स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात एसटी महामंडळात इलेक्ट्रिक बस वाढणार असल्याने पूर्वनियोजन करण्यात आले आहे. प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री