कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील उंड्रीतील एका सोसायटीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत आग लागून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा बळी गेला. अग्निशामक दलाच्या जवानांसह रहिवासीही जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी या सोसायटीची पाहणी केली, तेव्हा तेथील अग्निशामक यंत्रणा बंद असल्याची धक्कादायक बाब तपासणीत उघडकीस आली. अग्निशामक यंत्रणा कुचकामी असल्याने गगनचुंबी इमारतीत राहणारा प्रत्येक रहिवासी आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंड्री भागात मार्व्हल आयडियल सोसायटी ही चौदा मजली इमारत आहे. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेत शुक्रवारी (२६ सप्टेंबर) दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी शाळेतून घरी दमून परतलेला पंधरावर्षीय तर्ष कमल खेतान गाढ झोपला होता. त्याचे वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. आई दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडली होती. खेतान यांच्या सदनिकेतून धूर येऊ लागला आणि काही क्षणांत आग भडकली. सदनिकेतील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.

दलाची उंच शिडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत वेळ लागणार होता. त्यामुळे जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सोसायटीत बसविण्यात आलेली अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे उघड झाले. आग पसरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. लिफ्ट बंद होती. अशा परिस्थितीत जवान जिन्याने बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. जवानांनी दोरीचा वापर करून पाण्याचा पाइप बाराव्या मजल्यापर्यंत नेला. त्यानंतर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जिवाची बाजी लावून त्यांनी सदनिकेत अडकलेल्या तर्ष याला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, अग्निशामक यंत्रणा कुचकामी ठरल्याने त्वरित मदत पोहोचू शकली नाही आणि तर्षचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सोसायटीतील रहिवासी डाॅ. मृणाल मयंक (वय ४२), योगेश गिरीधर जाधव (वय ४५), जिशान साहिल खान (वय ३५), विनोद मोहन लिमकर (वय ३२), तसेच अग्निशामक दलाचे जवान विश्वजित मधुकर वाघ (रा. कोंढवा बुद्रुक), पृथ्वीराज परमेश्वर खेडकर (रा. कोंढवा खुर्द) जखमी झाले.

तर्षच्या मृत्यूने हळहळ व्यक्त झाली. मात्र, हे प्रश्न हळहळ व्यक्त करून सुटणारे नाहीत. कोट्यवधी रुपयांच्या सदनिका असलेल्या सोसायट्यांत अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित नसणे, ही बाब निश्चित शरमेची आहे, असे अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांनी नमूद केले. पुण्याचा विस्तार वाढत आहे. महानगरात आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. माहिती तंत्रज्ञानासह खासगी क्षेत्रातील कर्मचारी पुण्यातील हडपसर, उंड्री, पिसोळी, कोंढवा, कात्रज-कोंढवा रस्ता, बाणेर, औंध, वाघोली अशा उपनगरांतील गगनचुंबी इमारतीत सदनिका खरेदी करतात. आयुष्यभराची पुंजी सदनिकाखरेदीत लावली जाते. दागदागिने मोडून खरेदीस हातभार लावला जातो. गृहकर्ज घेऊन सदनिकेचे स्वप्न साकारले जाते.

इमारत बांधताना अग्निशामक यंत्रणेसह विविध अटींची पूर्तता केल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विविध प्रकारच्या परवानग्या दिल्या जातात. बांधकाम व्यावसायिक सुरुवातीची एक-दोन वर्षे सोसायटीची जबाबदारी सांभाळतात. सोसायटी स्थापन केल्यानंतर सर्व जबाबदारी रहिवाशांवर सोपविली जाते. तेथून सोसायटीतील पदाधिकारी आणि रहिवाशांची जबाबदारी निश्चित होते. सोसायटीतील मलनिस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा, टाकीची स्वच्छता, अंतर्गत स्वच्छता यांसह अग्निशामक यंत्रणेची देखभाल याबाबत शहरातील प्रत्येक सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी ‘उंड्री’तील घटनेपासून धडा घेण्याची वेळ आली आहे. ‘चकचकीत’ सोयीसुविधेकडे लक्ष देणाऱ्या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी अग्निशामक यंत्रण कार्यान्वित आहे की नाही, याची नियमित तपासणी वर्षातून किमान दोनदा तरी करावी. कारण, एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाची मदत पोहोचेपर्यंत वेळ लागू शकतो. थोडीशीही हलगर्जी जिवावर बेतू शकते, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.

rahul.khaladkar@expressindia.com