सागर कासार | राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत आहे. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांची देखील आहे. अवकाळी पावसाचा फटका, पुरंदर तालुक्यातील काळेवाडी गावामधील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील काही शेतकर्याशी संवाद साधण्यात आला.
या काळेवाडी गावात दोन एकर शेतीमध्ये पावटा, भुईमूग आणि झेंडू असं पीक अनिता झेंडे घेतात. मात्र चार महिन्यापासून सततच्या पावसामुळे हाताला आलेले, पीक डोळ्यासमोर वाया गेल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याबाबत अनिता झेंडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, आम्ही पिढ्यानपिढ्या शेती व्यवसाय करत आहोत. आजवर एवढा कधीही पाऊस पाहिला नाही. मात्र यंदा एवढा पाऊस झाला की, आमचं उभ राहिलेलं पीक सततच्या पावसाने भूईसपाट झाले आहे. कधी पाऊस नाही म्हणून, पेरणी कशी करायची हे संकट होत. मात्र, आता अशा या पावसामुळे हाताशी आलेल पीक गेलं आहे. या शेतीवर आमचं घर अवलंबून आहे. आता आम्ही कस जगायचं? असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे. त्यात माझा मुलगा इयत्ता पाचवीमध्ये आहे. आज शाळेला सुट्टी असल्याने, तो देखील माझी मदत करतो आहे. अभ्यास करण्याच्या वयात, त्याला शेतात काम करताना पाहून वाईट वाटत. घरी पैसे राहिले नाही. त्यामुळे यंदा त्याच्या शाळेचा खर्च करणे अवघड होणार आहे. सरकारने लवकरात लवकर आम्हाला मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील काळेवाडीमधील सीताफळ, डाळिंब, अंजीराला सर्वाधिक फटका
राज्यात अवकाळी पावसामुळे 325 तालुक्यातील 54 लाख 22 हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामुळे ज्वारी, बाजरी, गहू, मका, धान, तूर, सोयाबीन आणि फळबाग यांना सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी राज्यातील शेतकर्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच, परिस्थिती पुणे जिल्ह्याची देखील असून 21 हजार 681 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील दिवा गाव येथील साधारण 3000 हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या काळेवाडी गावातील शेतकरी सीताफळ, डाळिंब, अंजीराची सर्वाधिक लागवड करतात. मात्र चार महिन्यापासून सततच्या आणि अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले त्यांचे पीक वाया गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.