पुणे : आता आधीचे पुणे उरलेले नाही. शहराची विस्तार मर्यादा संपली असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि प्रदूषण होत आहे. दिल्लीला नवी दिल्ली, मुंबईला नवी मुंबई तसे पुण्यासाठी आता नवीन पुणे वसवण्याची आवश्यकता आहे. यासाठी बांधकाम व्यावसाय़िकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रेडाई पुणे मेट्रोच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गडकरी बोलत होते. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, कपिल गांधी आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> “मोदी जागतिक स्तरावरील नेत्यांना गांधींच्या समाधीवर नतमस्तक व्हायला नेतात आणि भिडे…”; असीम सरोदेंचा हल्लाबोल

गडकरी म्हणाले की, नवी मुंबई, नवी दिल्लीसारखी शहरे काळानुरूप विकसित झाली. पुण्याच्या बाबतीत तसे घडले नाही. प्रत्येकाला पुणे शहरातच राहायचे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. पुण्याचा आजूबाजूला विकसित होणाऱ्या रस्ते व उड्डाणपूल यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करताना तिथे गृहप्रकल्प व संलग्न सुविधा विकसित करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येईल. पुणे-बंगळुरू महामार्ग आणि आगामी पुणे-औरंगाबाद द्रुतगती महामार्ग या ठिकाणी हे करता येईल. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनातील घरांच्या दर्जाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, या घरांचा दर्जा इतर घरांपेक्षा खराब असतो. बांधकाम व्यावसायिकांनी नफ्याकडे फारसे लक्ष न देता परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून चारशे चौरस फुटांच्या सदनिका देण्याबाबत सरकार प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा >>> शासकीय कार्यालयातील कंत्राटी पदभरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही पदभरती तात्पुरत्या…’

एक कोटीचं घर कोण घेतो?

सध्या बांधकाम व्यावसायिकांकडून महागडी घरे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. एक कोटी रुपयाच्या घरांची विक्री केली जाते. परंतु, एक कोटीचे घर घेणे किती जणांना परवडते? याऐवजी बांधकाम व्यावसायिकांनी परवडणारी घरे बांधावीत. त्यांचा नफा यातून काही प्रमाणात कमी होईल मात्र एकूण व्यवसाय वाढेल, अशा कानपिचक्याही गडकरींनी बांधकाम व्यावसायिकांना दिल्या.

नजीकच्या काळात पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात पुढील ३ महिन्यांत होईल. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari present new pune concept in front of building developers pune print news stj 05 zws
First published on: 15-09-2023 at 21:17 IST