पुणे : शहर परिसरात घरफोडी, तसेच वाहनचोरीचे गुन्हे करणाऱ्या ‘बारक्या’ टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी चोरट्यांबरोबर गुन्हे करणाऱ्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून १० लाख ३१ हजारांचे सोन्याचे दागिने, चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पृथ्वीराज उर्फ साहील संतोष आव्हाड (वय १९, रा. हडपसर), आनंद उत्तरेश्वर लोंढे (वय ३४, रा. हडपसर गाडीतळ), आर्यन कैलास आगलावे (वय १८, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), कुलदीप गणपत सोनवणे (वय १९, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरात वाहन चोरी आणि घरफोडीचे गुन्हे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक गस्त घालत होते. गुन्हेगारी वर्तुळात आव्हाड हा वयाने लहान असल्याने त्याला ‘बारक्या’ या टोपणनावाने ओळखले जाते. तपास पथकातील पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, समीर पिलाणे यांना या टोळीने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी, तसेच वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडून दहा लाख ३१ हजारांचे सोन्याचे दागिने आणि चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टोळीने अलंकार, चतु:शृंगी, हडपसर, लोणीकंद भागात सहा गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, सचिन पवार आणि पथकाने ही कारवाई केली.