लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात, सोमवारी, १३ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानावर अवकाळी पावसाचे सावट आहे. सोमवारी राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवित आहे. पण, उन्हाच्या झळांमुळे मतदार घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहे. आता सोमवारी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळीचे सावट असल्यामुळे मतटक्का घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-मसाले उत्पादनांची झाडाझडती खोळंबली; ‘एफडीए’चे अधिकारी वेगळ्याच कामात

हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. आज, शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात. शनिवारी पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र. रविवारी किनारपट्टी वगळता सर्व महाराष्ट्र आणि सोमवारी, १३ मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डीत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागांतही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पाऊस कमी पडला तरीही वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात ‘घड्याळ’; राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यात पारा चाळीशी खाली

ढगाळ हवामानामुळे आणि राज्याच्या विविध भागांत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे कमाल पारा चाळीशीच्या खाली आला आहे. विदर्भात अकोल्यात ४३.२, वाशिममध्ये ४१.२, नांदेडमध्ये ४०.२. परभणीत ४१.०, मध्य महाराष्ट्रात जळगावात ४१.८, मालेगावात ४२.४, सांगली ४०.० सोलापूर ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. राज्याच्या अन्य जिल्ह्यांत पारा चाळीशीच्या आतच राहिला. किनारपट्टीवर डहाणूत ३४.३ अंश सेल्सिअस तापमान वगळता पारा सरासरी ३३.५ अंशांवर होता. मुंबईत ३३.८ तर सांताक्रुजमध्ये ३३.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.