पुणे : वैष्णवी हगवणेचे पती शशांक आणि दीर सुशील यांनी पुण्यातील निवासाचा पत्ता दाखवून शस्त्र परवाना घेतल्याचे उघडकीस आले. पुणे पोलिसांकडून त्यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. हगवणे मुळशी तालुक्यातील भुकूमचे आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या हगवणे बंधूनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती, सासू, सासरे, दीर, नणंदेला अटक करण्यात आली आहे. पती शशांक, दीर सुशील, तसेच नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविला. तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हगवणे बंधूंनी शस्त्र परवान्यासाठी पौड पोलिसांकडे अर्ज केला होता. तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी शस्त्र परवाना नाकारला होता. त्यांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी वास्तव्याचा पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत दिली होती. शस्त्र परवाना अर्जासोबत देण्यात आलेला भाडेकरार दोन महिने जुना होता. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी नमूद केले.