पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत असून याच प्रकरणात सीआयडीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रूपयाच्या जमिनी आणि शॉप खरेदी केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोरील एका इमारतीमध्ये ३ ऑफिस वाल्मिक कराड यांनी पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले. हे शॉप खरेदी करण्यास पुण्यातीलच भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मदत केल्याने सीआयडीकडून दत्ता खाडे यांना नोटीस बजविण्यात आली असावी, अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्या सर्व घडामोडी दरम्यान काल सोमवारी केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला दत्ता खाडे सामोरे गेले.

आणखी वाचा-अपंगांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता तालुका स्तरावरही मिळणार अपंग प्रमाणपत्र

त्या एकूणच चौकशीबाबत दत्ता खाडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी सार्वजनिक जीवनात जवळपास ४० वर्षांपासून असून तीन वेळा नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे. या राजकीय जीवनामध्ये माझा संबध गोपीनाथ मुंडे यांच्याशी आला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजकीय जीवनात काम करीत राहिलो. गोपीनाथ मुंडे ह्यात असताना, माझी वाल्मिक कराड यांच्याशी तीन ते चार वेळा भेट झाली असेल, त्यानंतर कधी ही आमची भेट झाली नाही किंवा फोन देखील झाला नाही.

पण काल केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करिता बोलवले. त्यानंतर मी चौकशीला गेल्यावर मला अधिकार्‍यांनी जवळपास वीस प्रश्न विचारले. तुमचा आणि वाल्मिक कराड यांच्या संबध बाबत, तुमच्या मुलाच्या लग्नाला आले होते. यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले आणि तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सोडले आहे. तसेच पुन्हा चौकशीला बोलवल्यास जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुण्यात बांगलादेशींवर घुसखोरांवर कारवाईचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फर्ग्युसन रोडवरील ऑफिस खरेदी वाल्मिक कराडला तुम्ही मदत केल्याने तुम्हाला सीआयडी च्या अधिकार्‍यांनी चौकशीला बोलावले अशी चर्चा आहे. त्या प्रश्नावर दत्ता खाडे म्हणाले की, या भागातील नगरसेवक राहिल्याने अनेकजण शॉप किंवा घर खरेदी करताना माझा सल्ला घेतात, जेणेकरून खरेदी मध्ये काही सवलत मिळेल, पण फर्ग्युसन कॉलेज समोरील ऑफिस खरेदीमध्ये मला कोणाचाही फोन आला नाही. तसेच या प्रकरणी संबधीत बिल्डर अधिक माहिती देऊ शकेल, कोणाचा फोन आला, किती कोटींचा व्यवहार झाला. त्यामुळे माझा या खरेदी प्रकरणाशी काही संबधी नसून माझी आणि वाल्मिक कराड यांची जात एकच आहे. यामुळे मला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याच त्यांनी सांगितले.