नारायणगाव : आळेफाटा येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले यांच्या घरावर ८ ते १० जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांनी रविवारी रात्री दरोडा टाकून १२ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना पुढे आली आहे. या दरोड्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आले असून, पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे.

आळेफाटा परिसरात असलेल्या वडगाव आनंद गावाच्या हद्दीत अनंत चौगुले यांचे निवासस्थान आहे. दरोडेखोरांनी सुरुवातीला वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील चौगुले मळ्यात राहत असलेल्या रमेश चौगुले यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख ८० हजार रुपये लंपास केले.

त्यानंतर याच मळ्यात राहणाऱ्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले यांच्या बंगल्याचा मागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. कपाटातील सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदीच्या वस्तू आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा सुमारे १२ लाखांचा ऐवज चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण १० आरोपी असल्याचे दिसून आले आहे. या चोरीचा तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसांत आरोपी निष्पन्न होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वास जाधव, पोलीस निरीक्षक, आळेफाटा पोलीस ठाणे ……………