पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने मावळमधून माधवी जोशी यांना तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु, वंचितने अद्याप उमेदवार जाहीर केला नव्हता. कर्जत येथील माधवी जोशी या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी शनिवारी वंचितमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे.

हेही वाचा : “अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’पणा ठासून भरला आहे म्हणूनच…”, शिवाजी आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि बारामतीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. आता आफताब अन्वर मकबूल शेख यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि वंचितच्या शेख यांच्यात तिरंगी लढत होईल.