पुणे : शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. हडपसर परिसरातील फुरसुंगी भागात गुरुवारी मध्यरात्री टोळक्याने मोटारी, दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. दाेन दिवसांपूर्वी धनकवडी, विश्रांतवाडी भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२४ जुलै) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास आरोपी दुचाकीवरुन ॲरो विहार सोसायटी परिसरात आले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. आरोपींनी शिवीगाळ करुन दहशत माजविली. आरोपींनी त्रिवेणीनगर भागात रस्त्यावर लावलेल्या मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केली. पोलीस हवालदार बोबडे तपास करत आहेत.
२४ तासांत आरोपी अटकेत
धनकवडी परिसरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुण आरोपींसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपी आखाड पार्टी करून वाढदिवस असलेल्या अल्पवयीन मुलाला भेटण्यास त्या परिसरात आले होते. मात्र, मित्राने भेटण्यास नकार दिल्याने आरोपींनी रागाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होतेे.
‘आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही,’ असे आरडाओरड करत बुधवारी (२३ जुलै) मध्यरात्री १५ रिक्षा, दोन मोटार आणि एका व्हॅनची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सराइत गुन्हेगार रोहित कैलास आढाव (२१, रा. किरकटवाडी) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. त्यानुसार पोलिसांनी नवले पूल परिसरात सापळा रचून आढाव आणि सुधीर बाप्पू सावंत (१९, रा. गोरावी वस्ती, नांदेड फाटा) यांना अटक करण्यात आली. चौकशीत वाहन तोडफोड प्रकरणात तीन अल्पवयीना सामील असल्याचे उघडकीस आले. बुधवारी सायंकाळी एका अल्पवयीनाकडून विश्रांतवाडी भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती.
दरम्यान, कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात शिरून टोळक्याने हल्ला केला होता. खाद्यपदार्थांची पाकिटे फेकून दिले होते. दुकानासमोर लावलेली रिक्षाची काच फोडण्यात आली होती. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती.गेल्या काही दिवसात शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ओैंधमधील विधाते वस्ती परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याने १५ वाहनांची तोडफोड केली होती. शहरात किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत.