पुणे : केंद्र सरकारने देशभरात वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही अत्याधुनिक गाडी असल्यामुळे प्रवाशांमध्येही तिच्याबद्दल कुतूहल आहे. आता ही गाडी आणखी आधुनिक रूपात दाखल होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणांसह या गाड्यांचे उत्पादन चेन्नईतील रेल्वे उत्पादन प्रकल्पात सुरू आहे. लवकरच नव्या स्वरूपातील ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मागील वर्षीपासून चेन्नईतील प्रकल्पातून दोन हजार ७०२ रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षात या प्रकल्पातून ३० प्रकारच्या तीन हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नवीन प्रकारच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. याच वर्षी वंदे भारत गाड्यांचे वंदे मेट्रो रूप सादर केले जाणार आहे. ही गाडी शहरांतर्गत जवळच्या अंतरासाठी वापरण्यात येईल. प्रवाशांना गाडीत सहजपणे चढता आणि उतरता यावे, यासाठी तिला समांतरपणे दोन्ही बाजूला उघडणारे दरवाजे असतील.

हेही वाचा : पुणे: सोसायटीतील निवडणुकीचा वाद; सभासदांना ई-मेल करुन महिलेची बदनामी

जम्मू आणि काश्मीर भागात तापमान गोठणबिंदूजवळ असते. त्यामुळे तिथे चालविल्या जाणाऱ्या वंदे भारत गाड्यांच्या डब्यात उष्ण तापमान करण्याची सुविधा आणि जलवाहिनी गोठू नये, अशी यंत्रणा विकसित केली जात आहे. पुढील वर्षी ही गाडी तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मालवाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी गतिशक्ती गाड्या विकसित केल्या जात आहेत. ई-कॉमर्ससह जलद वाहतूक गरजेची असणाऱ्या वस्तूंसाठी या गाड्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

हेही वाचा : Monsoon Update: विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्राला ‘यलो ॲलर्ट’

स्लीपर वंदे भारतचेही नियोजन

लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी स्लीपर म्हणजेच शयनयान सुविधा असलेल्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या वंदे भारत गाड्यांमध्ये अशी सुविधा नाही. त्यामुळे स्लीपर सुविधा असलेल्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : सिल्लोड कृषी महोत्सवावर सरकारची मेहरनजर; चौकशीच्या फेऱ्यात अडकूनही ५४ लाख ७१ लाख रुपये मंजूर

अशी असेल नवी वंदे भारत…

  • खुर्च्यांचे कुशन अधिक चांगले
  • आधीपेक्षा मोबाइल चार्जिंगसाठी चांगली सुविधा
  • एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये पाय ठेवण्यासाठी मोठी जागा
  • जास्त खोली असलेली वॉश बेसिन
  • स्वच्छतागृहातील प्रकाश योजनेत वाढ
  • वाचनासाठीचा दिवा सहजपणे वापरता येण्यासारखा