पुणे : सकारात्मक ऊर्जेने केलेले कोणतेही काम चांगलेच होते. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या सकारात्मकतेमुळे एक चांगली कलाकृती घडली. हा प्रवास खूप काही शिकविणारा होता, अशी भावना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी व्यक्त केली. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा उपक्रमात देशपांडे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

देशपांडे म्हणाले, चित्रपटाला रसिकांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा आहेच, पण आपण केलेल्या कामाची शासन दरबारी घेतली गेलेली दखलही महत्त्वाची आहे. आजोबा हयात असेपर्यंत सवाई गंधर्व महोत्सवात दरवर्षी गायचे. जेव्हा मी या महोत्सवात गायलो, त्यावेळी ‘माझा नातू वसंतरावांपेक्षाही चांगला गायला आहे’, असे आजी प्रत्येकाला सांगत होती. नातवाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे बघून तिला नक्कीच खूप आनंद झाला असता. संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

संगीत रंगभूमीची परंपरा युवा पिढीला समजावी या हेतूने मी काही जुनी संगीत नाटके केली. परंतु यापुढे नवीन संकल्पनेवर संहिता मिळाली तर नवीन संगीत नाटक करेन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक