पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात शि. द. फडणीस येत्या मंगळवारी (२९ जुलै) वयाची शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त वसुंधरा क्लब, कार्टूनिस्ट्स कम्बाइन, पु. ना. गाडगीळ अँण्ड सन्स, रेवा डायमंड्स आणि कोहिनूर समुह यांच्या वतीने ‘शि. द. १००’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते बालगंधर्व कलादालनात रविवारी (२७ जुलै) व्यंगचित्र प्रदर्शानाचे उद्घाटन करून महोत्सवाला सुरूवात करण्यात येणार आहे.
महोत्सावाचे निमंत्रक राजकुमार चोरडिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव, चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते. महोत्सवात शि. द. फडणीस यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘‘शिदं’च्या रुपाने देशातील एकमेव सक्रिय व्यंगचित्रकार शतकी वाटचाल पूर्ण करत आहे. ही राज्यातील प्रत्येक कलावंतासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे महोत्सवात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ‘शिदं’ना मानवंदना देण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.’ असेही चोरडीया यांनी स्पष्ट केले.
महोत्सवात काय ?
महोत्सवात २७ ते २९ जुलै दरम्यान व्यंगचित्रांचे खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील अनेक व्यंगचित्रकारांकडून ‘शिदं’ना खास व्यंगचित्रे भेट देण्यात येणार आहेत. ती व्यंगचित्रे आणि ‘शिदं’ची व्यंगचित्रे यांचे प्रदर्शन ‘हसरी गॅलरी’ कलादालनात भरविण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी अकरा वाजता ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हा राज्यातील जुन्या-नव्या व्यंगचित्रकारांची, त्यांच्या रेषा, शैली, विनोदातून नवी ओळख करून देणारा दृक-श्राव्य कार्यक्रम ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी सादर करणार आहेत.
सोमवारी सकाळी अकरा वाजता ‘शि. द. – कला आणि कल्पना’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना भावलेले शि. द. फडणीस या विषयावर मंगला गोडबोले, प्रा. मिलिंद जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी, सतीश पाकणीकर यांच्याशी चारुहास पंडित संवाद साधणार आहेत.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता ‘शब्दांवाचून…’ हा देश-विदेशातील शब्दविरहित व्यंगचित्रकलेची ओळख करून देणारा, रसग्रहणाचा दृक-श्राव्य कार्यक्रम व्यंगचित्रकार विवेक प्रभुकेळुस्कर सादर करणार आहेत.
महोत्सवात दररोज दुपारी चार वाजता विशेष दृक-श्राव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल कार्टून प्रात्यक्षिके आणि राज्यातील मान्यवर व्यंगचित्रकारांकडून ‘अर्कचित्रे’ पाहता येणार आहेत. त्यात योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, शुभम जिंदे, उमेश कवळे हे कलाकार सहभागी होणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते शि. द. फडणीस यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. ‘शिदं’ची शतकी वाटचाल दाखवणारा ‘हसरी सेंच्युरी’ दृक-श्राव्य कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे.