शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्र डागलं आहे. “बारामती मतदारसंघातील निवडणूक शरद पवार आणि राष्ट्रवादीला अवघड जाणार आहे. शरद पवार मोठे नेते असून त्यांचं कर्तुत्व होतं. पण, देशात शरद पवारांची विश्वासार्हता राहिली नाही,” असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

“बारामती मतदारसंघात पाप करून चुकीच्या आणि लोभी लोकांना निवडून देत देशभर चुकीचे संदेश गेले. दोन-दोन पंतप्रधानांना बारामतीत आणून मुर्ख बनवायचं आणि तालुका दाखवायचा. पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि इंदापूरात काय केलं हे दाखवा. सर्व प्रकल्प एका ठिकाणी आणत ते दाखवून मुर्ख बनवायचं,” अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.

हेही वाचा : “…म्हणून राऊतांची भाषा बदलली”, अजित पवारांवरील टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला

“सखा पाटील आणि इंदिरा गांधींचाही पराभव झालेला”

“४० वर्षे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना आम्ही मतदान केलं. याबदल्यात आम्हाला काय मिळालं? आता फुटकची मते मिळणार नाहीत, हा निर्णय जनतेने घेतला आहे. सखा पाटील आणि इंदिरा गांधींचाही पराभव झालेला. देशभरात ब्लॅकमेलिंगचे काम करणाऱ्या लोकांना घरी बसवण्याचे काम बारामती लोकसभा मतदारसंघालाच करावे लागेल,” असेही विजय शिवतारेंनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे धृतराष्ट्र झालेत, त्यांना…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवरून शिंदे गटातील नेत्याचं टीकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोकशाहीचा वापर करून सरंजामशाहीने वागणाऱ्यांना…”

“बारामती मतदारसंघातील निवडणूक शरद पवार आणि राष्ट्रवादीला अवघड जाणार आहे. शरद पवार मोठे नेते असून, त्यांचं कर्तुत्व होतं. पण, देशात शरद पवारांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना व्यक्तीगत शरद पवार किंवा पवार कुटुंब नाहीतर, लोकशाहीचा वापर करून सरंजामशाहीने वागणाऱ्यांना बारामती मतदारसंघात पराभव करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील सगळे कारखाने, रयत शिक्षण संस्था, पुणे शिक्षण मंडळ, वीएआय ताब्यात घेऊन मनमानी चालू आहे,” असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला आहे.