गुंजवणी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन गावठाणात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, गरज भासल्यास सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. अद्याप जमिनी न घेतलेल्या शेतकऱ्यांनी या महिनाभरात जमिनीचा पसंतीक्रम कळवून जमिनी घ्याव्यात, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
गुंजवणी धरणाच्या (ता. वेल्हे) क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या घरांचे उद्घाटन शिवतारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील कानंद, कोदापूर, भोसले वस्ती व इतर गावांमधील नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांनी घरे सोडून नवीन गावठाणात स्थलांतर केले आहे. उर्वरित नागरिकांनीही स्थलांतर करावे, अशी विनंतीही शिवतारे यांनी केली. शिवतारे म्हणाले, की गुंजवणी प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन हरित लवादानेही प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. नव्या गावठाणात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यकता असल्यास आणखी सुविधांची निर्मिती केली जाईल.