पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेल्या टीकेला राज्याचे जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ‘कुणी काय करावे आणि काय करू नये, हे शरद पवारांनी सांगू नये. लोकांनी त्यांना निवृत्त करण्याऐवजी, काही लोकांनी आता स्वत:हूनच निवृत्ती स्वीकारली पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणावरूनही विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. ‘शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचे पाप केले आहे. त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्याचे प्रायश्चित त्यांनी करायला हवे आणि दुसऱ्याला सल्ला देणेही बंद करायला हवे,’ असा टोला विखे पाटील यांनी लगावला.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष झाल्यानंतर विखे पाटील यांनी पुण्यात सारथी संस्थेच्या विविध योजना आणि कामकाजाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठकी घेतली. त्यात सारथीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, योजना आणि राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती विखे पाटील यांनी घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.

दरम्यान, नाशिमध्ये (१५ सप्टेंबर) राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार शरद पवार यांनी मोर्चाला संबोधित केले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या आजूबाजूला पाहा काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा सल्ला दिला. ‘नेपाळमध्ये गेल्या ८ दिवसात काय घडलंय ते पाहा राज्यकर्ते गेले. एक भगिनी आली. तिच्या हातात राज्य दिले गेले. अजून काय झालं त्याच्या खोलात जात नाही. मात्र शहाणपणा हा शिकण्याचं काम हे देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशी आशा व्यक्त करतो,’ असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला होता.

शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आता त्याचे प्रायश्चित त्यांनी करायला हवे आणि दुसऱ्याला सल्ला देणेही बंद करायला हवे. – राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष