इंदापूर : सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे काठोकाठ भरले आहे. धरणातील पाणीसाठा हा सुमारे ९७ टक्के झाला असून, भीमा नदी पात्रात ९८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
या धरणातील पाणीसाठा हा वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी ७० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणाची पाणीपातळी वाढत असल्याने मंगळवारी ९८ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
नागरिकांना इशारा
भीमा नदीपात्राची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. जनावरे, अवजारे, यंत्रसामग्री नदी काठी ठेऊ नयेत. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी सांगितले.
धरणाची पाणीपातळी वाढू लागल्याने या परिसरातील ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाचे प्रशासनही सज्ज आहे. नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.