लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून बिनदिक्कत वाहतूक केली जात असल्याचे उपप्रादेशिक विभागाच्या (आरटीओ) नियमित तपासणीतून समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ने नव्याने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत एक हजार ५०६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ६०१ वाहनचालकांकडून दंड २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

खराडी येथे शालेय वाहतूक करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वाहतूक नियमावलीनुसार वाहन योग्यता तपासणी प्रमाणपत्र, वाहतूक परवाना, चालकाचा परवाना, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी), प्रथमोपचार औषधांचा संच, वाहनामध्ये मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या, खिडक्या, पायऱ्या, अग्निरोधक उपकरणे आदींची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, सीएनजी वाहन असल्यास सीएनजी योग्यता प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.

आणखी वाचा-नोकरदारांसाठी सुरू केलेल्या अभ्यासक्रमांना किती झाले प्रवेश? धक्कादायक आकडेवारी आली समोर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरभर ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायदा नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

‘आरटीओ’ने जानेवारी ते नोहेंबर पर्यंत केलेली कार्यवाही

  • एकूण शालेय वाहन तपासणी – १,५०३
  • दंडात्मक कारवाई केलेले वाहनचालक – ६०१
  • वसूल केलेली दंडात्मक रक्कम – २१.९९ लाख