पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. १ ते ४ जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियम येथे सारस्वतांचा मेळा भरणार असून, या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविले होते. दुसऱ्या कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही. एकमताने पाटील यांची निवड करण्यात आल्याने बैठकीमध्ये मतदान घेण्याची वेळ आली नाही, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने नैतिकता म्हणून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही, असे जोशी यांनी स्पष्ट केले. साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महामंडळाच्या मार्गदर्शन समितीने संयोजकांसमवेत ठरविलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यास साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

साहित्य संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये

  • ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला निघणार असून, त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कविकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
  • ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना चार दिवस लाभ घेता येणार आहे.
  • वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे.
  • निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत

शाहू स्टेडिअमवर होणार संमेलन

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम आहे. योगायोग असा की १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी, गझलकट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलीस संचलन मैदानाची आठ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.

विश्वास पाटील यांची साहित्य संपदा

– पानिपत- संभाजी

– गाभूळलेल्या चंद्रबनात- नागकेशर

– पांगिरा- झाडाझडती (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त)

– चंद्रमुखी- लस्ट फॉर लालबाग

– क्रांतिसूर्य- महानायक

– आंबी- महासम्राट

– महासम्राट खंड दुसरा- दुडिया

– पानिपतचे रणांगण- नॉट गॉन विथ द विंड

– बंदा रुपाया- अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान

– दी ग्रेट कांचना सर्कस