बारामती : ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चौदा तासांमध्ये संदीपसिंग गिल यांनी बारामती, इंदापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. येत्या सहा महिन्यांत बारामती शहर सुरक्षित शहर करणार असल्याची ग्वाही गिल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गिल यांनी रविवारी बारामतीत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती शहर पोलीस ठाण्याला भेट देत माध्यमांशी संवाद साधला. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गिल म्हणाले, ‘बारामतीमध्ये सेफ सिटी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील सहा महिन्यांत सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त बारामतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहने दिली जाणार असून, रिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठीची कार्यवाही तातडीने केली जाईल. दरम्यान, शक्ती अभियानांतर्गत ९० हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं आणि युवक-युवतींपर्यंत पोलीस पोहोचले असून, कायद्याच्या दृष्टिकोनातून बारामती शहराला अधिक सुरक्षित करण्यासाठीचा प्रयत्न राहणार असल्याचे बिरादार यांनी सांगितले.
कोयता गँग अशी कोणतीही विशिष्ट गँग जिल्ह्यात नाही. शेतकरी शेतात कोयत्याचा वापर करतात. त्यामुळे तो कोठेही सहज उपलब्ध होतो. त्याचा गुन्ह्यात वापर वाढलेला आहे. त्यावर यापुढील काळात विशेष लक्ष ठेवले जाईल. सायबर व आर्थिक गुन्हे जिल्ह्यात घडत आहेत. युवा वर्ग, ज्येष्ठ व वर्क फ्राॅम होम करणाऱ्यांना त्यात टार्गेट केले जात आहे. त्यामुळे सायबर साक्षरतेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आगामी काळात पोलीस विभागाकडून सायबरसंबंधी जनजागृती केली जाईल.