चहा-बिस्किटे, पोहे, उपमा अशा अल्पोपहारासह राजगिरा लाडू आणि फळांचे वाटप, नेत्रतपासणी आणि आरोग्य तपासणी, रेनकोट आणि छत्रीवाटप तसेच छत्र्यांची दुरुस्ती,थकलेल्या शरीराला मालिश,अशा विविध प्रकारे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी वारकऱ्यांची गुरुवारी सेवा केली.
टाळ-पाखवाजच्या साथीने रंगणारी भजने तसेच अभंगांच्या ध्वनिफितीचे कानावर पडणारे सूर यामुळे पुणेकर भाविकांना शहरभर प्रासादिक वातावरणाची अनुभूती आली.
दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली. त्यामुळे वारी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुणेकरांनी पालखीचे दर्शन घेतले. नाना पेठ येथील निवडुंग्या विठ्ठल मंदिर येथे संत तुकाराम महाराज यांची तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आहे. गुरुवारी सकाळपासून भाविकांची पावले पालखीच्या दर्शनासाठी या मंदिरांकडे वळू लागली आणि शहराच्या पूर्व भागामध्ये जणू पंढरी अवतरली. सर्वत्र वारकऱ्यांची सेवा सुरू असताना भाविकांनी लवून माऊली अशी साद घालून वारकऱ्यांना नमस्कार केला.
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. चौकाचौकात वारकऱ्यांना न्याहरी आणि चहा देण्यात आला. काही ठिकाणी मोफत कटिंग आणि दाढी करून वारकऱ्यांच्या चरणी सेवा रुजू करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली होती. काही वारकऱ्यांनी शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस येथे भेट दिली. दिंडीतील भजनाची वेळ सांभाळून काही वारकऱ्यांनी नातेवाईकांची भेट घेतली. तर, अपल्या नातलगांना भेटण्यासाठी काहींनी दिंडी गाठली. वारकऱ्यांच्या संचारामुळे शहरभर चैतन्याचे वातावरण अनुभवावयास मिळाले.